मानवत शहरातील पेठ मोहल्ल्यात आणखी दोन दुचाकी जाळल्या
15 दिवसात वाहन जाळण्याच्या तीन घटना
मानवत(प्रतिनिधी)
येथील पेठ मोहल्ला परिसरातील नगरेश्वर मंदिरासमोर उभ्या असलेल्या दोन स्प्लेंडर मोटारसायकली रविवार 22 मार्चच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली. गेल्या 15 दिवसांतील ही तिसरी घटना असून, सातत्याने होणाऱ्या वाहन जाळपोळीच्या सत्रामुळे शहरात भीतीचे सावट पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागेश्वर मंदिरासमोर राहणारे पुरुषोत्तम शिवाजी भायेकर यांची स्प्लेंडर एमएच 22 बीएफ 6404 आणि स्वप्नील भिकू घोडके यांची स्प्लेंडर एमएच 17 एटी 5444 या दोन्ही दुचाकी मंदिरामोर उभ्या होत्या. मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात इसमाने या गाड्यांना आग लावली. क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केल्याने दोन्ही दुचाकी जळून खाक झाल्या. घटनेची माहिती मिळताच रात्रगस्तीवर असलेले पोलीस अधिकारी विजय लबडे, पोलीस उपनिरीक्षक किशन पतंगे यांनी तातडीने भेट दिली. सकाळी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देवकते आणि पोलिस हवालदार नारायण सोळंके यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. पंधरा दिवसांत तीन वेळा वाहन जाळपोळीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या सर्व प्रकरणांचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे करावा आणि गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, नागरिकांनी सतर्क राहावे आणि कोणत्याही संशयास्पद व्यक्तीची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.शहरात गेल्या दोन आठवड्यांपासून वाहने जाळण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. आतापर्यंत एक ऑटोरिक्षा आणि तीन मोटारसायकली अशा एकूण चार वाहनांना लक्ष्य करण्यात आले आहे. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे गुन्हेगारांनी पोलिसांना उघड आव्हाण दिले असून, सर्वसामान्य नागरिकांच्या मालमत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Post a Comment